एकाचवेळी आजी-माजी खासदारांना इशारा

Foto
भाजपच्या नादाला का लागला? असा तिखट सवाल माजी खासदार  चंद्रकांत खैरे यांनी करताच सेनेचे आमदार त्रिकूट चांगलेच सतर्क झाले. गेल्या दोन दिवसांपासून या त्रिकुटाने एकत्र भेटींचा सिलसिला सुरू केला असून एकाच वेळी आजी आणि माजी खासदारांना  इशारा दिला, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. 
 शहरात कोरोना संसर्ग रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आले होते. सुभेदारीवर भाजप -शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आमदारांनी प्रशासनाविरोधात रणशिंग फुंकले. त्यानंतर विभागीय आयुक्तांची भेट घेतली. या सर्व घडामोडी दुरुनच पाहणारे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे संतप्त झाले. शिवसेनेच्या आमदारांना डॉक्टर कराड यांचे नेतृत्व मान्य आहे का ? असाच तिखट सवाल करीत ही पक्षाविरोधी कृती असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधी पक्षातील खासदारांच्या सुरात सूर मिसळत असल्याची टीकाही होऊ लागली. त्यामुळे आ. प्रदीप जैस्वाल, संजय सिरसाट, अंबादास दानवे हैराण झाले.
घाटी वरून दमदाटी !
 स्वपक्षातीलच नेत्याची नाराजी आणि खा. इम्तियाज जलील यांनी घाटीला केलेले टार्गेट या विषयावरून आता सेनेचे आमदार त्रिकूट एकत्र आले आहेत. काल घाटी प्रशासनासोबत बैठक घेत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे या आमदारांनी स्पष्ट केले. एकीकडे खासदार घाटीला दमदाटी करीत असताना सेनेचे आमदार खंबीरपणे घाटी प्रशासनाच्या पाठीमागे उभे राहून योग्य तो इशारा देत आहेत. या घटनेलाही राजकीय पदर असल्याचे बोलले जाते. सेना एमआयएम विरोधाची धार कमी होता कामा नये याची काळजी या बैठकीद्वारे घेतली गेली.
माजी खासदारांनाही सूचक इशारा 
दरम्यान शिवसेनेचे नेते खैरें यांच्या आरोपानंतर हे  तीनही आमदार एकत्र आले. एकत्र बैठकीचा सिलसिला सुरू ठेवला आहे. काल घाटी प्रशासनासोबत बैठक आणि आज पोलीस आयुक्तांकडे बैठक घेत आ. जैस्वाल, आ.शिरसाट आणि दानवे यांनी हम साथ साथ है चा इशारा स्वपक्षातील नेत्यालाही दिला आहे.